कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा तब्बल चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र लॉकडाऊनबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून राज्यातील जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन विभाग व एसटी महामंडळाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. आंतरजिल्हा एसटी बस प्रवासाबाबत या बैठकीत चर्चा झाली.
वडेट्टीवार म्हणाले की, बससेवा सुरू करण्याबाबत आम्ही पुढील आठवड्यात निर्णय घेऊ. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबद्दल मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आंतरजिल्हा एसटी प्रवासावर बंदी आहे. याबाबत पुढील आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन लागू झाल्यावर राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यावर मर्यादीत एसटीसेवेलाही परवानगी देण्यात आली होती. सध्या एसटी सेवा सुरु असली तरीदेखील जिल्हांतर्गतच सेवा सुरु असून प्रवाशांची संख्याही मर्यादीत ठेवण्यात आली आहे.